Ad will apear here
Next
पुष्करच्या हिमालयस्वारीने दिली प्रेरणा


कुडाळ (सिंधुदुर्ग) :
‘सोळावं वरीस धोक्याचं’ असे म्हणतात; पण सावंतवाडीच्या पुष्कर कशाळीकर याने सोळाव्या वर्षी धोक्यांचा सामना करून थेट हिमालयाला आव्हान दिले. गेल्या वर्षी त्याने हिमालयातील ‘झांजकर-हिमालया सायकलिंग एक्स्पीडीशन’ ही जगातील अतिशय खडतर परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. कुडाळ रोटरी क्लबने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याचा हा साहसी प्रवास उलगडत गेला. मोहिमेचे थरारक व्हिडिओ आणि पत्रकार शेखर सामंत यांनी खुबीने घेतलेली पुष्करची मुलाखत यामुळे हा कार्यक्रम उपस्थितांना एक वेगळीच प्रेरणा देऊन गेला. 

पुष्कर हा सावंतवाडीतील सुबोधन आणि माधवी कशाळीकर या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा. सावंतवाडीच्या एस. पी. के. महाविद्यालयात शिकणारा. हिमालय त्याने पाहिला नव्हता; मात्र अॅडव्हेंचर सायकलिस्ट असलेल्या आपल्या वडिलांची सायकलवरून हिमालयस्वारी करायची इच्छा पूर्ण करायची, असे त्याने ठरवले होते. या मुलाने आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन हिमाचल गाठले. पहिल्याच प्रयत्नात त्याने १२ हजार फुटांपासून ते १८ हजार फुटांपर्यंतच्या अत्यंत धोकादायक अशा दऱ्या आणि पर्वतीय प्रदेशातून जाणाऱ्या मार्गावरून सायकलने मार्ग काढून त्याने थेट हिमालयावर स्वारी केली. 

ज्या ठिकाणी कुठलेही वाहन जात नाही, अशा मार्गावरून सायकलने प्रवास करीत पर्वत पालथे घालायचे, असे त्याने ठरवले होते. ठाणे येथील ज्येष्ठ अॅडव्हेंचर सायकलिस्ट असलेले ६५ वर्षीय रमाकांत महाडिक, विविध साहसांची आवड असलेले पनवेल येथील निखिल पाटील, मूळचा केरळचा असलेला, पण मुंबई-डोंबिवली येथे मध्य रेल्वेमध्ये चालक असलेला जयकुमार अशा सर्व साहसी वीरांशी संपर्क साधून पुष्करने ‘हिमालयन सायकलिंग एक्स्पीडीशन’ टूरचे आयोजन केले होते. त्याचा हा प्रवास ‘रोटरी क्लब ऑफ कुडाळ’ने समोर आणला. पत्रकार शेखर सामंत यांनी त्याच्याशी संवाद साधला. 

खडतर मार्गाने सायकलने प्रवास करायचा आणि ही टूर पूर्ण करायची, असा निर्धार या चौघांनी केला. यासाठी यापूर्वी कुणीही सहसा सायकलने प्रवास केला नसलेल्या मार्गाची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली. आधी मनाली, त्यानंतर १३ हजार फूट उंचीवर असलेली रोहतांग पास, तिथून १६ हजार फूट उंचावर असलेली शिकु ला पास, थोडं खाली उतरून १४ हजार फूट उंचीवरील पेंजी ला पास, तिथून पुढे १२ हजार ९०० फुटांवरील नमकी ला पास, तिथून वर चढत १३ हजार फुटांवरील पोटु ला पास आणि सर्वांत शेवटी जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १८ हजार ३० फूट उंचीवरील खारदुंग ला पास असा मार्ग निश्चित करण्यात आला होता.

हा प्रवास २३ दिवस सुरू होता. या दरम्यान पुष्कर व त्याच्या टीमने अनेक थरारक अनुभव घेतले. दिवसभरात नऊ ते दहा तास त्यांचे सायकलिंग असायचे. चांगले रस्ते क्वचितच मिळायचे. त्यांना बहुतांशी प्रवास खोल व निमुळत्या होत गेलेल्या दऱ्यांच्या कड्यांवरून, झुलत्या पुलांवरून, नद्यांमधून, बर्फातून व दगडधोंड्यांच्या वाटेवरून करावा लागला. प्रचंड दमछाक करणारे कित्येक किलोमीटरचे चढ, खाली पाहताक्षणी चक्कर येईल असे उतार, हाडे गोठवणारी थंडी, वेगाने वाहणारे वारे अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुष्कर व त्याच्या टीमने ही खडतर परिक्रमा पूर्ण केली.

पुष्कर याच्या या ‘झांजकर-हिमालया सायकलिंग एक्स्पीडीशन’ची गोष्ट कुडाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांनाच प्रेरणा देऊन गेली. भविष्यात पुष्कर ट्रान्स सैबेरियन सायकल मोहिमेत सहभागी होणार आहे. त्यासाठी त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. रोटरीचे अध्यक्ष प्रमोद भोगटे, एस. आर. एम कॉलेजचे प्राचार्य डॉ. डिसले, रोटेरियन गजानन कांदळगावकर, राजेंद्र केसरकर, प्रेमेंद्र पोरे, अभिजित परब, डी. के. परब, अभिषेक माने आणि कुडाळ सायकल क्लबचे अजित कानशिडे, अमोल शिंदे, अजिंक्य जामसंडेकर आणि कुडाळ कॉलेजचे प्राध्यापक या वेळी उपस्थित होते. 

पुष्करने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ही परिक्रमा पूर्ण केली. त्या वेळपासूनच जिल्ह्यात सायकलिंगला चांगले दिवस येऊ लागले आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टर्सनी एकत्र येऊन सायकल क्लब स्थापन केले आहेत. त्यामध्ये आता बाकीचे सायकलप्रेमीसुद्धा सहभागी होऊ लागलेत. कुडाळ आणि सावंतवाडीत ही चळवळ सातत्याने सुरू आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZIEBQ
Similar Posts
‘हम साथ साथ हैं!’ कुडाळ : कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या १९८९-९०च्या कॉमर्सच्या बॅचचे विद्यार्थी तब्बल २७ वर्षांनी एकत्र आले. फक्त एकत्र जमून मौजमजा न करता पन्नाशीकडे झुकलेल्या सर्वांनीच एकमेकांच्या सुख-दु:खात साथ देण्याचा आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी कायमस्वरूपी एक निधी उभारण्याचा निश्चय या सर्वांनी केला
ऑस्ट्रेलियन तरुणाईला कोकणच्या खाद्यसंस्कृतीची भुरळ! कुडाळ : कोकणातील, विशेषतः मालवणी खाद्यसंस्कृतीने ऑस्ट्रेलियन तरुणाईला भुरळ घातली आहे. फास्ट फूडपेक्षा येथील खाद्यपदार्थ चविष्ट आणि आरोग्याला चांगले आहेत, असे मत कोकणात अभ्यासदौऱ्यावर आलेल्या तरुण विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलिया येथून १३ विद्यार्थी व विद्यार्थिनी कुडाळ तालुक्यातील निवजे
सिंधुदुर्गात फेरफटका - भाग दोन ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या उत्तरेकडचा भाग पाहिला. या भागात माहिती घेऊ या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागाची.
हेवा वाटावा असे हेवाळे गाव दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १२० किलोमीटर दूर असलेल्या दोडामार्ग तालुक्यात एका टोकाला वसलेल्या हेवाळे गावात विकासाची गंगा येऊ पाहते आहे. गावाचे युवा सरपंच संदीप देसाई यांनी ग्रामस्थांचा विश्वास जिंकून आपल्या गावाला विकासाची दिशा दाखवली आहे. सर्वांच्याच कष्टाची फळे आता दिसू लागली आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language